Monsoon and Debilitating Asthma

Monsoon and debilitating asthma

पावसाळा आणि दमविणारा दमा

जेष्ठ महिना संपून आषाढ सुरू झाला की पावसाळी वातावरण रंगू लागतं. आषाढातल्या भरून आलेल्या ढगांबरोबर कवि-कल्पना जुळू लागतात. पण डॉक्टरांना मात्र या ढगांबरोबरच अनेक आजारांच्या सूचना मिळतात.

अलर्जी /दमा

भरून आलेलं आभाळ म्हणजे दमेकऱ्यांसाठी संकटच असतं. श्वास घेताना कोंडल्यासारखं वाटणं, धाप लागणं, छातीत दुखणं, अस्वस्थ वाटणं, ताप येणं, थकवा येणं असे त्रास होऊ शकतात. मुलांना बाळदमा असेल तर असे त्रास जास्त सतावतात.

घरगुती उपाययोजना

आरोग्यसंस्कृती

दम्याचा त्रास असताना नेब्युलायझर, पंप, औषधाचा वाफारा, श्वासनलिका विस्फारक औषधं आदी नेहमीची उपाययोजना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पुढील काही उपाय रुग्णाला बरं वाटण्यासाठी करता येतात.

१. एक वाटी तेल (तीळाचं) कोमट करून त्यात सैंधव मीठ घालावं. सैंधव मीठयुक्त अशा या तेलाने छातीला फासळ्यांच्या दिशेने हळूवारपणे मसाज करावा. तवा गरम करून त्यावर फडका ठेवावा आणि या गरम फडक्याने छाती शेकावी. यामुळे छातीतला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते.

२. गरम पाण्याची वाफ घेणं. साध्या गरम पाण्याच्या वाफेने साठलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. विशेषतः मुलांना कफ किंवा सर्दी झाल्यास एका मोठ्या भांड्यात उकळलेले पाणी घ्यावं. ते भांडं उंच बादलीच्या तळाशी ठेवावं आणि मुलांना बादलीच्या तोंडाजवळ पोहोचणारी वाफ घ्यायला प्रोत्साहित करावं. मुलाच्या नाकातून पाणी येऊ लागतं. सर्दी वाहून जाते आणि दम्यापर्यंत जाण्याची शक्यता कमी होते. कफ दाटणं तसंच सुकून जाणं यामुळे दम लागणं वाढू शकतं. त्याचीसुद्धा विशेष काळजी घ्यावी.

३. ‘दम’ लागल्यावर काय करावं? श्वासाचा दमा किंवा झाल्यावर योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. या दम्याच्या तडाख्यामुळे रात्री झोप येत नाही. त्यामुळे विशेषतः आडवं झोपणं शक्य होत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी बसून काढाव्या लागतात.
पहाटे अस्वस्थता वाढते. रात्रीच्या रात्री मग अक्षरशः अशावेळी उशी समोर ठेवून त्यावर डोकं ठेवून विश्रांती घ्यावी. संपूर्ण आडवं न होता छाती, डोळे वरच्या बाजूला करून थोडी आरामदायक अवस्था येऊ शकते.

खाणं-पिणं

पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. खाण्यात पचण्यासाठी जड पदार्थ टाळावेत. सुंठ, मिरी, पिंपळी, दालचिनी आदी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा. कुळीथ पिठाचं पिठलं, हिरव्या मुगाचं वरण, शेवग्याच्या शेंगांची आमटी, मिक्स पिठांची भाकरी, कोवळ्या मुळ्याचे किसून केलेले पराठे, वेगवेगळ्या फळभाज्यांचे सूप या गोष्टी जेवणात समाविष्ट करायला हव्या. तसंच फ्रीजमधले थंड पदार्थ, दही, तळलेले तसंच मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ आणि ज्या पदार्थांची अॅलर्जी आहेत असे पदार्थ टाळावेत.

घरामधल्या वातावरणात बदल –दमट वातावरणात दमवणाऱ्या दम्याचा हल्ला होतो. निसर्गातलं वातावरण आपल्याला बदलता येत नसलं तरी घरामधलं वातावरण मात्र नक्कीच बदलू शकतो. त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं.

१. घरातल्या एसीसारख्या विद्युत उपकरणांची योग्य ती निगा राखावी.
पावसाळयात AC वापरू नये.

२. दम्याच्या रुग्णांच्या उशीचे कवर रोज बदलावेत.

३. पावसाच्या पाण्यामुळे घरात कुठे गळती होत असेल तर त्यावर योग्य ती उपाययोजना करावी.

४. घरात भिंतींना ओल येत असेल तर दमटपणा वाढून दम्याचा त्रास वाढू शकतो.

यासाठी या ओल येण्याला प्रतिबंध करावा.

५. गुग्गुळ-राळ-वेखंड-अगरु इ.
पदार्थ जाळून धूपन करावं. पावसाळ्यात केलेलं धूपन अनेक आजारांना प्रतिबंध करतं.

६. उदबत्ती किंवा इतर तत्सम सुगंधांची काहीजणांना (धुळ,धुर) अॅलर्जी असते. तरी अशा गोष्टींचा वापर प्रकर्षाने टाळावा.

७. पाळीव प्राणी, विशेषतः मांजरांच्या अंगावरचे केस दमेकऱ्यांना त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणं केव्हाही उत्तम!

८. पावसाच्या पाण्यात भिजणं आणि नंतर केस ओले राहणं यामुळं दमा उफाळू शकतो. ते टाळावं.

वमन

दम्याच्या त्रास असणाऱ्यांनी आयुर्वेद पंचकर्म तज्ज्ञांच्या सहाय्यांने वमन करून घ्यावं. त्यामुळे सर्दी, खोकला, अॅलर्जी, ताप, दमा या त्रासांना प्रतिबंध होतो.

बस्ति
औषधी तेलाचे व औषधी काढयाचे हे शरीरातील वात व कफ कमी करुन दम्याचा त्रास
कमी करु शकतो. ज्यांना हा त्रास होतो त्यांनी
बस्ति चिकित्सा करावी व ज्यांना हा त्रास होत नाही त्यांनी
ही भविष्यात त्रास होऊ नये म्हणून बस्ति करावी.

 

* आरोग्य तज्ज्ञ *

वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)

श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44

शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.
पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.